He Gajavadan for Android
आरती प्रभू यांनी 1970च्या सुमारास "अजब न्याय वर्तुळाचा‘ या नाटकासाठी लिहिलेल्या नांदीच्या ओळी आणि प्रत्येक मराठी मनात वसलेली "सुखकर्ता दुःखहर्ता‘ ही आरती अशा दोन काव्यांचा संगम करून कुलकर्णी यांनी "हे गजवदन वक्रतुंड महाकाय‘ ही रचना स्वरबद्ध केली आहे. पियानो, गिटार, सतार, सरोद, पखवाज, मृदंगम अशी वेगवेगळी वाद्य, कथक नृत्यासाठीची पढंत, पाश्चात्त्य ड्रम अशा वेगवेगळ्या स्वर-तालांचा समावेश करून ही रचना सजविण्यात आली आहे.
ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या सुरेल स्वराने ही रचना सुरू होते. त्यानंतर शास्त्रीय संगीतातील शौनक अभिषेकी, संजीव अभ्यंकर, आनंद भाटे, राहुल देशपांडे, सावनी शेंडे, मंजूषा पाटील, अनुराधा कुबेर, महेश काळे, भावसंगीत व चित्रपट गीतातील अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, नंदेश उमप, वैशाली सामंत, संदीप खरे, मधुरा दातार, विभावरी आपटे, हृषीकेश रानडे, ऊर्मिला धनगर, मंगेश बोरगावकर, अभिजित कोसंबी यांच्यासह वेगवेगळ्या पिढीतील गायकांचे स्वर हे गाणे ऐकताना कानावर पडतात. या गायकांसोबतच कौशल इनामदार, मिलिंद इंगळे, नीलेश मोहरीर, मिथिलेश पाटणकर, मिलिंद जोशी या संगीतकारांनीही या गाण्याला आपला स्वर दिला आहे. या सर्वांनी एक-एक ओळ आपल्या आवाजात गायली आहे. असा संगीताविष्कार प्रथमच रसिकांसमोर येत आहे.